मोशीत दोन महिला वारकऱ्यांना चिरडून फरार झालेल्या टेम्पो चालकाला अटक

769

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – मोशी येथून देहूगावच्या दिशेने पायी वारीसाठी निघालेल्या दोन महिलांना चिरडून फरार झालेल्या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तब्बल २०६ वाहनांची तपासणी करुन एमआयडीसी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली.

पांडुरंग बबन पानमंद (वय ४२, रा. राजगुरुनगर, खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी टेम्पो चालकाचे नाव आहे. तर जनाबाई अनंता साबळे आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (दोघीही, रा. बीड) असे टेम्पोच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनाबाई आणि सुमनबाई या दोन महिला आपल्या दिंडीसोबत बीड येथून पायी देहूच्या वारीसाठी आल्या होत्या. त्यावेळी मोशी येथून देहुच्या दिशेने जात असताना त्या रस्ता ओलांडत होत्या. इतक्यात भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पोसह फरार झाला होता. यावर एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने मोशी-चाकण रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या आधारे तब्बल २०६ वाहनांची तपासणी करुन आरोपी टेम्पो चालकाला अटक केली. एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.