सासरचे लोक पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावरुन निराश झालेल्या मोशीतील एका जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी (दि. २) रात्री मोशीतील खंडेवस्ती येथे घडली.

रुपेश उत्तम जाधव (वय २८, रा. खंडेवस्ती, मोशी), असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहवासी आहे. तो सध्या मोशी येथील खंडेवस्ती राहत होता. दोन वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. दोन महिन्यांपासून त्याची पत्नी एका कार्यक्रमानिमित्त माहेरी गेली होती ते परतलीच नाही. रुपेश पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला असता, सासरच्या मंडळींनी पत्नीला रुपेश सोबत पाठवले नाही. त्यामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. सोमवारी रात्री तो मोशीतील त्याच्या घरी आला. त्याने स्वतःच्या अंगाला सासू-सासरे आणि मेहुण्याच्या फोटो चिटकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच आत्महत्या करण्या आगोदर त्याने माझ्या मृत्यूला पत्नी व सासरचे लोक जबाबदार असल्याची व्हिडिओ तयार केला. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.