मोरवाडीत काचेच्या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे आग; चौघा कामगारांची सुखरुप सुटका

95

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – मोरवाडीतील मोहम्मदिया आर्ट ग्लास या काचेच्या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत अडकलेल्या चार कामगारांची अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली. ही घटना शनिवारी (दि.६) रात्री उशीरा घडली.

इरफान शेख (वय ४५), अखिल मुजावर (वय ४५), आसिफ (वय ३५) आणि शान बाज (वय ३५) असे सुटका करण्यात आलेल्या कामगारांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री उशीरा मोरवाडीतील मोहम्मदिया आर्ट ग्लास येथे शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. यावेळी इरफान, अखिल, आसिफ आणि शान बाज हे चौघे कंपनीमध्ये झोपले होते. मीटरमधून धूर निघत असल्याचे एकाने पाहिले. परंतु, बाहेरून शटर बंद आणि मोठा पाऊस सुरू असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. परिसरात करंट देखील उतरला होता. म्हणून कोणी शटरकडे गेले नाही. आत झोपलेल्या कामगार इरफान शेख याने फोनद्वारे अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच तेथे अग्निशामक दल दाखल झाले. त्यांनी महावितरणला फोन करून वीजप्रवाह बंद करण्यास सांगितला आणि आतील घाबरलेल्या कामगारांना आवाज देऊन शटर उघडण्यास सांगितले. आणि कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

ही कामगिरी अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, हनुमंत होले, निखिल गोगवले, अमोल चिपळूणकर, संभाजी दराडे, वाहन चालक विशाल बाणेकर यांच्या पथकाने केली.