मोबाईलच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा निर्घृण खून

764

भिवंडी, दि. १६ (पीसीबी) –  फोन करण्यासाठी मोठ्या भावाने घेतलेला मोबाईल लहान भावाने परत मागितला म्हणून दोघांमध्ये वाद झाला, यावर संतापलेल्या लहान भावाने फावड्याने मोठ्या भावाच्या डोक्यात प्रहार करुन त्याचा निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना भिवंडी तालुक्यातील बासे गावात घडली.

दत्तात्रेय काळुराम पवार (वय ३५) असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.  याप्रकरणी लहान भाऊ संतोष पवार (वय ३२) याच्यावर मोठ्या भावाचा खून केल्याने पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दत्तात्रेय याची पत्नी माहेरी गेल्याने तिच्याशी बोलण्यासाठी त्याने लहान भाऊ संतोषकडून त्याचा मोबाईल घेतला होता. मात्र बराच उशीर झाल्याने  संतोषने त्याचा मोबाईल परत मागितला. त्यावेळी मोबाईल परत देण्यावरुन दत्तात्रेय आणि संतोष या दोघा भावांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या संतोषने घराच्या कोपऱ्यात असलेला फावड्याने दत्तात्रेय याच्या डोक्यावर प्राणघातक वार केले. यामध्ये दत्तात्रेयचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाताच पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संतोष याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.