मोदी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन

93

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन केले. राजधानी दिल्लीपासून मुंबई, पुणे, सातारा, अमरावतीत आंदोलन करण्यात आले. पुण्यात बाळासाहेब थोरात, साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण तर राज्याच्या विविध भागात काँग्रेसच्या दिग्गज नेते-मंत्र्यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.

काँग्रेसने मोदी सरकार विरोधात ‘स्पीक अप इंडिया’ हे आंदोलन भारतभर सुरु केले आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अमरावती अशा ठिकाणी काँग्रेसचे आंदोलन झाले. सोशल मीडियावरही काँग्रेसने इंधन दरवाढीचा निषेध केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पुण्यात सहभागी झाले होते. “वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल” असा फलक हाती घेत त्यांनी नारेबाजी केली. साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनात विश्वजित कदम यांच्यासह जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर सोलापूरमध्ये काँग्रेस भवनासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अमरावतीच्या इर्विन चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीचे फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमालीचे घसरले असताना त्याचा फायदा इंधनाचे दर कमी करुन जनतेला पोहचवण्याऐवजी उत्पादन शुल्कात सातत्याने वाढ करुन खिसे भरण्याचे काम मोदी सरकार करत आहे!” असा आरोप कॉंग्रेसने केला.

“यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतानाही इंधनाचे दर संतुलित ठेवण्यात आले होते. मात्र आज कच्च्या तेलाच्या किंमती कमालीच्या घसरलेल्या असतानाही उत्पादनात शुल्कात वाढ करुन मोदी सरकार जनतेची लुटमार करत आहे!” असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

इंधन दरवाढ केवळ रविवारच्या दिवशी थांबली होती, मात्र सोमवारचा दिवस उजाडताच ही घोडदौड पुन्हा सुरु झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव मुंबई-दिल्लीसह देशाच्या बहुतांश भागात पुन्हा वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल 87.17 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 78.81 रुपये प्रतिलिटर दर आहे. पेट्रोल 5 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 12 पैसे प्रतिलिटर महाग झाले आहे.

WhatsAppShare