मोदी सरकार कृषी, लघु-मध्यम उद्योगांसह ‘या’ क्षेत्रांना देणार दिलासा

93

 

दिल्ली, दि.७ (पीसीबी) – केंद्र लॉकडाउनमुळे फटका बसलेल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, हॉटेल व्यवसाय, हवाई वाहतूक, कृषि आणि कृषिशी संबंधित उद्योगांच्या अडचणींचा आढावा घेत आहे. या क्षेत्रांना लॉकडाउनच्या काळात किती नुकसान सोसावे लागले. त्यासंबंधातील आकडेवारीचा अभ्यास करून पॅकेज तयार करण्याचे काम सुरू आहे. पॅकेज तयार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते मांडले जाणार आहे. बैठकीत चर्चा झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

करोनाच्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता सर्वच क्षेत्र ठप्प आहेत. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून, लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे.

यासाठी पंतप्रधान कार्यालयाने एक समिती नेमली आहे. कृषीसह इतर उद्योगांना मदत देण्यासाठी सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउन लागू होऊन १४ झाले आहेत. दरम्यान, या निर्णयानंतर केंद्र सरकारनं पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत १ लाख ७० हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं होते. यात शेतकऱ्यांपासून ते दररोज काम करुन उदरर्निवाह करणाऱ्या कामगारांना मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने लॉकडाउनमुळे फटका बसलेल्या इतर क्षेत्रांना मदतीचा हात देण्याचं काम सुरू केलं आहे.

WhatsAppShare