मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव; शिवसेना तटस्थ राहणार

77

मुंबई, दि. २० (पीसीबी) – लोकसभेत मोदी सरकारविरोधात आज (शुक्रवार) अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे.यावेळी शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना सभागृहात हजर न राहता तटस्थ राहण्याचा आदेश दिला आहे असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत सभागृहात अविश्वास प्रस्तावावर पक्षाची बाजू मांडणार आहेत.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत.

अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमने अविश्वास  प्रस्ताव आणला आहे. याला काँग्रेससह बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभेत भाजपचे बहुमत अगदी काठावरचे आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.