मोदी यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला मुंबईतून अटक    

204

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रासायनिक हल्ला कऱण्याची धमकी दिल्याप्रकरणी   मुंबईत एका २१ वर्षीय तरूणाला ताब्यात घेतले आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्‍यासाठी या तरूणाने  एनएसजी मुख्‍यालयात फोन करून पंतप्रधानांवर हल्‍ला करण्याची धमकी दिली, असा आरोप त्‍याच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे.

शुक्रवारी (दि.२७) राष्‍ट्रीय सुरक्षा गार्डच्‍या मुख्‍यालयात एक फोन आला होता. यादरम्‍यान तरूणाने पंतप्रधान मोदींवर कधीही, कुठेही रासायनिक हल्‍ला होऊ शकतो, अशी धमकी दिली होती. त्‍यानंतर राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍थांनी याचा तपास केला असता हा फोन मुंबईतून लावण्‍यात आल्‍याचे समोर आले. त्यानंतर तपास संस्‍थानी  मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांनी तपास केला असता हे सिमकार्ड मुंबर्इतील वालकेश्‍वर परिसरातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.

फोन नंबर ट्रॅक करत असताना रविवारी रात्री साडे दहा वाजेच्‍या दरम्‍यान पोलिसांना हा नंबर मुंबई सेंट्रल रेल्‍वेच्‍या आसपास चालू असल्‍याचे दिसले. त्‍यानंतर पोलिस ताबडतोब नं‍बरचा शोध घेत लोकेशनवर पोहोचली व तेथून काशीनाथ मंडल नावाच्‍या तरूणाला ताब्‍यात घेतले. युवक झारखंडचा रहिवासी असून तो मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. त्याचा मुंबईतून पसार होण्याच्या प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.