मोदींमुळे रस्त्याच्या कडेला उभे राहत अमोल कोल्हेंना करावे लागले सभेला संबोधित

266

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) – पंतप्रधानांच्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या गुरुवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात होणाऱ्या तीन सभा रद्द करण्यात आल्या. प्रोटोकॉलच्या नावाखाली मनमानी सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांची सभा रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि सभेला जमलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. मात्र, अमोल कोल्हेंनी अनोख्या पद्धतीने सभेला उपस्थित राहत भाषण केले.

भोसरी आणि चिंचवडमध्ये होत असलेल्या या सभेला कोल्हेंनी चांदवड-नाशिक रोडच्या कडेला उभे राहत फोनवरुन संबोधित केले. अमोल कोल्हे यांनी सभेला संबोधित करतानाचा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे…. आज पिंपरी चिंचवड आणि भोसरी याठिकाणी सभा नियोजित होत्या..परंतु ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोल मधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली..मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे Prime Minister Circuit मध्ये नसताना औरंगाबादची परवानगी सुद्धा नाकारण्यात आली..आणि बाय रोड एरंडोलवरून पुण्याला यायला निघालो..नियोजित सभा अशा कारणामुळे रद्द कराव्या लागल्याची रुखरुख होतीच..चिंचवड आणि भोसरी दोन्ही ठिकाणी सांगितलं की शक्य झाल्यास live screening करू..परंतु Digital India च्या दैदिप्यमान यशामुळे शक्य झालं नाही..तरीही चिंचवड आणि भोसरीच्या मायबाप मतदारांना संबोधित केलं.. समोर श्रोते नसताना एक सभा अशीही झाली रस्त्याच्या कडेला…वक्ता चांदवड नाशिक येथे आणि मायबाप मतदार भोसरी आणि चिंचवड मध्ये! अडचणी जेवढ्या अधिक तेवढी संघर्षाला धार अधिक आणि संघर्ष जेवढा अधिक तेवढी यशाची झळाळी अधिक, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून डॉ. कोल्हे यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विलास लांडे यांच्यासाठी भोसरीच्या गावजत्रा मैदानात, अण्णा बनसोडे यांच्यासाठी आकुर्डी गावात, राहुल कलाटे यांच्यासाठी सांगवीत डॉ. कोल्हे यांची जाहीर सभा होणार होती. त्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली होती.

नागरिकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. डॉ. कोल्हे एरंडोल, चोपडा येथील सभा उरकून हेलिकॉप्टरने पुण्यात येणार होते. मात्र, पंतप्रधान पुण्यात असल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी परवानगी मिळू शकली नाही. परिणामी, त्यांच्या तीनही सभा होऊ शकल्या नाहीत.

 

 

WhatsAppShare