“मोदींनी कृषी कायदे मागे घेण, ही उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना?”

55

नागपूर, दि.१९ (पीसीबी) : अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. मात्र आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य करताण म्हंटल आहे कि, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण ही केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना? असा सवाल करतानाच आपल्यामुळेच 600 शेतकऱ्यांचा या आंदोलनात जीव गेल्याचं मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले कि, “पंतप्रधानांनी वादग्रस्त कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका पाहून तर ही खेळी केली नाही ना? आज कायदे मागे घेतले उद्या सत्तेत आल्यावर पुन्हा हे कायदे आणले तर जाणार नाही ना? केवळ निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठीचा हा फंडा तर नाही ना? असे सवाल करतानाच निवडणुकी आधी महागाई कमी करायची, काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिली आहे, त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही. या आंदोलनात 600 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याला जबाबदार मोदी सरकारच आहे. आपल्याचमुळे हे शेतकरी दगावल्याची जाहीर कबुली देत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. कृषी कायदे रद्द करायला इतका उशीर का केला? 600 शेतकऱ्यांचा बळी घेण्याची काय गरज होती. पूर्वीच कृषी कायदे रद्द केले असते तर शेतकऱ्यांचा विरोध झाला नसता. ग्रामीण भागातील शेतकरी सरकार विरोधात पेटून उठली आहे. त्यांचा भडका उडाला आहे. महागाईमुळे जनता आणि शेतकरी त्रस्त आहे. केवळ पाच दहा रुपयांनी पेट्रोल कमी केल्याने महागाई नियंत्रणात येणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

या कृषी कायद्याविरोधात राज्यात आंदोलन झालं. देशात झालं. राज्यकर्ते त्यांना भेटायला गेले नाही. शेतकरी दिल्लीत पोहोचू नये म्हणून खिळे ठोकले गेले. थंडी, ऊन, वारा, पावसात शेतकरी बसला होता. या दरम्यान 600 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. या मृत्यूची जबाबदारी घ्या. माझ्यामुळेच या लोकांचा मृत्यू झाला हे तुम्हाला देशातील जनतेला सांगावं लागेल. कायदे रद्द केले त्याचं स्वागत करतो. कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरलं त्याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झालं. त्यांच्या आंदोलनामुळेच कायदे मागे घ्यावे लागले, असंही ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसनेही आंदोलन केलं होतं. काँग्रेसने समर्थन केलं. रस्त्यावर उतरली. आमच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही या कायद्याला विरोध केला. यावेळी भाजपकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अंगावर गाडी टाकली. आंदोलन चिरडण्याचे हे धंदे होते. पण शेतकरी ठाम राहिला. शेतकऱ्यांच्या संघर्षाचं यश आणि निवडणुकीत बसलेल्या चपराकीचा हा विजय आहे. यूपीत हादरा बसेल, दिल्लीतील सरकार जाईल म्हणूनच सरकारला झुकावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.

WhatsAppShare