मोदींना रोखण्यासाठी विरोधकांची उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये रणनीती

229

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणुकां लढवल्या तर  नरेंद्र मोदी यांचे दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे स्वप्न धुळीस मिळेल, असा विश्वास  काँग्रेसने व्यक्त केला  आहे. या तिन्ही राज्यांमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख भाजपविरोधी पक्षांमध्ये डावपेचात्मक सामंजस्य झाले आहे, याबाबतचे संकेत काँग्रेसमधील खात्रीशीर सूत्रांनी दिले आहेत.

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३० ते २४० जागा जिंकल्या. तरच मोदी  पुन्हा पंतप्रधान होऊ शकतात. भाजपने त्यापेक्षा कमी जागा जिंकल्यास तर मित्रपक्षच मोदींना पंतप्रधान होण्यास विरोध करतील. यामध्ये  शिवसेनाचाही विरोध असेल, असे काँग्रेस सूत्रांनी म्हटले आहे. मात्र, ही वेळ येण्यासाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये भाजपविरोधी पक्षांची मोट तयार होणे गरजेची  आहे. तरच  विरोधी पक्षांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे काँग्रेस सूत्रांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये लोकसभेच्या १६८ जागा आहेत. २०१४च्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी त्यापैकी १४६ जागा जिंकल्या होत्या. त्यात उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३, महाराष्ट्रात ४८ पैकी ४२, तर बिहारमध्ये ४० पैकी ३१ जागांचा समावेश होता. पण आता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यात युती निश्चित झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजदसोबत काँग्रेसची युती आहे.