मोदींना दिलेले अलिंगन पक्षातील सदस्यांना रूचलेले नाही- राहुल गांधी

122

नवी दिल्ली , दि. २३ (पीसीबी) – संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आलिंगन पक्षातील काही सदस्यांना रूचले नव्हते, अशी कबुली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी दिली. भारतात बेरोजगारी ही प्रमुख समस्या असून, पंतप्रधान याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

जर्मनीच्या हॅम्बर्ग येथील बुकेरियस समर स्कूलमध्ये बोलताना राहुल यांनी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या मोदींच्या आलिंगनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘पंतप्रधानांनी बेरोजगारीची समस्या स्वीकारायला हवी व त्यावर उपाययोजना करायला हवी’, असे ते म्हणाले. त्यांनी भारताच्या ७० वर्षांच्या प्रगतीवर आणि वडील राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांबद्दलही यावेळी टिपण्णी केली. ‘माझ्या वडिलांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला मी श्रीलंकेत मृतावस्थेत पाहिले, तेव्हा मला अजिबात आनंद झाला नाही. उलट त्याच्यात मला त्याची रडणारी मुले दिसली’, असे राहुल म्हणाले. राजीव गांधी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या ‘लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिळ ईलम’च्या (लिट्टे) वेलूपिल्लई प्रभाकरन याला श्रीलंकेच्या सैनिकांनी २००९मध्ये ठार केले होते. त्याबद्दल राहुल बोलत होते.