मोदींच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी देशभरात धाडसत्र; पोलिसांच्या हाती पत्र

263

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – देशभरात विविध ठिकाणी कथित नक्षलसमर्थनाच्या आरोपाखाली पुणे पोलिसांचे धाडसत्र सुरु आहे. पुणे पोलिसांची देशभरातली कालची कारवाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपाखाली केल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

यावर्षी जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या रोना विल्सन यांच्या घरातून पोलिसांच्या हाती एक पत्र लागले होते. या पत्रात मोदींना संपवण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येसारखीच पुनरावृत्ती करण्याचा उल्लेखही आहे. शिवाय चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेले एम४ हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लॅन या पत्रात आहे. त्यासाठी आठ कोटींची गरज असल्याचे म्हटले. पत्रातून धक्कादायक माहिती उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांकडून देशभरात काल ९ ठिकाणी चौकशी करण्यात आली, त्यातील ५  ठिकाणांहून ५ जणांना अटक करण्यात आली.

पुणे पोलिसांनी देशभरातून नक्षल्यांशी संबंधित असल्याच्या आरोपावरुन पाच जणांना अटक केली. प्रसिद्ध कवी वरवर राव, अरुण फरेरा, व्हर्नोन गोन्साल्वीस, गौतम नवलखा आणि सुधा भारद्वाज यांचा अटक केलेल्यांत समावेश आहे. यातील सुधा भारद्वाज यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात हजर केले असता त्यांना 30 ऑगस्टपर्यंत नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. तर इतर चौघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.