“मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचा निषेध करणार का? निर्णय रोखण्यासाठी फडणवीस पुढाकार घेणार का ?”

96

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : केंद्र सरकारने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतल्याने सोयाबीनचे भाव सातत्याने पडत आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन आयात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करणार का? तसेच हा निर्णय रोखण्यासाठी फडणवीस पुढाकार घेणार आहे का?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी दोन ट्विट करून हा सवाल केला आहे. सोयाबीनच्या भावावरूनही सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सोयाबीनचे भाव सातत्याने पडत आहेत. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने 12 लाख टन सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींबाबतही मोझांबिक सारख्या देशांना फायदा व्हावा याकरिता मोदी सरकारने करार केला होता. शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हेच मोदी सरकारचे धोरण आहे, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

एकेकाळी शेतकरी दिंडी काढून चिपळ्या वाजवत शेतकऱ्याची कणव आहे, असे दाखवून सोयाबीनला भाव मागणारे देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करणार का? सोयामील आयातीचा निर्णय थांबवण्यास मोदींना भाग पाडणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

सोयाबीनचे भाव
25/08/21- 11,111
30/08/21- 10500
04/09/21- 9500
13/09/21- 8800
17/09/21- 8400
18/09/21- 8000
20/09/21- 7000
21/09/21- 6000

केंद्र सरकार 30 ऑक्टोबरपर्यंतच परदेशातून सोयाबीन ढेपेची आयात करणार होते. मात्र, देशात सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे. अजून खरिपाचे पीक आलेले नाही. त्यामुळे टंचाई वाढू नये यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत सोयाबीन ढेपेची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने पोल्ट्री व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

खरिपाच्या अंतिम टप्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद, मुगाची काही प्रमाणात काढणी झाली असली तरी मुख्य पीक सोयाबीन हे पाण्यातच होते. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे, पण पदरी पडलेले सोयाबीन अतिरिक्त पावसामुळे डागाळलेले आहे. याचा परिणाम आता सोयाबीनच्या दरावर होऊ लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरुवातीला आवक झालेल्या सोयाबीनला तब्बल 11 हजाराचा दर मिळाला होता. मात्र, आता सोयाबीनची विक्री केवळ 5 हजार रुपये प्रमाणे होत आहे.

भारतात सोयाबीनचा सर्वात जास्त वापर पोल्ट्री खाद्य म्हणून केला जातो. देशातील एकूण उत्पन्नापैकी साठ टक्के सोयाबीन त्यासाठी वापरले जाते. साधरण पंचवीस टक्के सोयाबीनची निर्यात होते, तर पंधरा टक्के सोयबीनवर प्रक्रिया करून त्याचे मानवी खाद्य तयार केले जाते. नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांसाठी दर महिन्याला किमान 40 हजार टन खाद्य लागते. त्यात किमान 10 हजार टन सोयाबीन ढेप असते. कोंबड्यांचे खाद्य म्हणून व्यावसायिक सोयाबीन ढेपेला पसंदी देतात. कारण सोयबीनमध्ये प्रोटीन्स असतात. ते कोंबड्यांच्या वाढीसाठी पोषक असतात.

मात्र, सध्या भाववाढीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांची कोंडी झाली असून, त्यांनी शेंगदाणा आणि सूर्यफूल ढेपेचा पर्याय शोधला आहे. अजून आपल्याकडील सोयाबीन अजून बाजारपेठेत आले नाही. ऑक्टोबरपर्यंत सोयाबीन येईल. त्यानंतर ढेपेचे भाव कमी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे, पण दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला, तर सोयबीन पिकाचे नुकसान होऊ शकते.

WhatsAppShare