मोदींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा देशावरचा काळा डाग- मायावती

71

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – मायावती जितक्या काळ उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या त्याच्यापेक्षा अधिक काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. या मोदींच्या विधानावर मायावतींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, गुजरातमधील मोदींचा कार्यकाळ हा केवळ भाजपावरचाच नाही तर संपूर्ण देशावरचा काळा डाग आहे. मात्र, जेव्हा बसपा उत्तर प्रदेशात सत्तेत होती तेव्हा उत्तर प्रदेश दंगली आणि अराजकतामुक्त होता, अशा शब्दांत त्यांनी स्वतःची पाठही थोपटून घेतली.

मायावती म्हणाल्या, पंतप्रधानांनी बसपाला बेहेनजीकी संपत्ती पार्टी असे संबोधले आहे. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे जे काही आहे ते आमच्या शुभचिंतकांनी आणि समाजाने दिलेले आहे यात काहीही लपून राहिलेले नाही. बसपाला वैयक्तिक संपत्ती संबोधताना पंतप्रधानांनी आपल्या पदाच्या सर्व मर्यादा पार केल्याचा आरोप त्यांनी केला.

कालच पत्रकार परिषदेत मोदींवर आरोप करताना मायावतींनी म्हटले होते की, मोदी सरकारचा आता रा. स्व. संघानेही पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे त्यांचे जहाज आता बुडायला लागले असून त्यामुळे मोदी आता चिंताग्रस्त झाले आहेत.