मोदींचा पराभव करण्यासाठी शरद पवारांचा फॉर्म्युला तयार

1769

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – आगामी लोकसभा  निवडणुकीत भाजपविरोधात  विरोधी राजकीय पक्षांकडून  मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजप विरोधात सर्व पक्षीय लढत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदीचा पराभव करण्यासाठी नवा फॉर्म्युला तयार केला आहे.

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज (सोमवारी) झाली. यावेळी पवार बोलत होते.

पवार म्हणाले  की,  भाजपसोबत नसणाऱ्या  सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्या  पक्षाचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्याची गरज नाही. त्याउलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते  म्हणाले.

पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल, असे काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.  राजकारणातील बदल स्विकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल, असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा, असे पवार म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांबरोबर असून  शेतकरी कामगार पक्षही आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर, मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपाला सातत्याने विरोध केला आहे. मात्र, या पक्षांशी एकत्र येण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असे पवार यांनी  यावेळी स्पष्ट केले.