मोठी बातमी: राष्ट्रवादीचे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी शिवाय…

107

शिरूर, दि.१८ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा भरचौकात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्याच पध्दतीने जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे पवार यांना दिली आहे. हे पत्र शिरूर नगरपालिकेतील गटनेते प्रकाश धारिवाल यांना उद्देशून लिहण्यात आले आहे. या पत्रामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान शिरुर- हवेली तालुक्यात याचे तीव्र पडसाद उमटले असून लोकप्रतिनिधीबाबत जर अशी भाषा वापरली जात असेल, तर लोकप्रतिनिधीनी कामे कशी करायची असे सांगत पोलीसांनी याची गंभीर दखल घ्यावी, असे आमदार पवार यांनी म्हटले आहे.

शिरूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहले आहे. त्यात आमदार पवारांचा पालिकेतील हस्तक्षेप वाढल्याचा आक्षेप घेत त्यांच्यावर विविध आरोप केले आहेत. त्यांचा नगरपालिकेच्या पाबळ फाट्यावरील तसेच कुकडीच्या जमिनीवर डोळा असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. तसेच, प्रकाश धारिवाल यांच्याशिवाय आमदारांना शहरात फिरले तर त्यांना कोणीही विचारणार नाही. तुम्हाशी गोड गोड बोलून तुम्हाला मान दिल्यासारखे करतात. पण, त्यांचा नगरपालिका ताब्यात घेण्याचा डाव असल्याचेही त्या व्यक्तीने पत्रात नमूद केले आहे. आमदारांबरोबरच त्यांची पत्नी आणि मुलगाही नगरपालिकेत बैठका घेत असल्याचा आरोप केला आहे.

आमदारांना दुसरे मोठ झाल्याचे बघवत नाही. पण, एका दिवशी भरचौकात यांचाही महेंद्र मल्लावसारखा कार्यक्रम होणार, अशी धमकीची भाषा पत्रात वापरली आहे. धारिवाल यांनी आमचा नेता असल्यासारखे वागावे. आमदारांच्या नादी लागला तर नगरपालिका तुमच्या हातून जाईल. जनतेच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भ्रष्टाचारी लोकांना बाजूला सारा. रात्र वैऱ्याची आहे. बाकी पुढच्या पत्रात…असाही उल्लेख पत्रात केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

WhatsAppShare