मोठी बातमी: मुंबई पोलिसांवर समीर वानखेडेंचे गंभीर आरोप; पोलीस महासंचालकांकडे केली तक्रार: म्हणाले…

78

मुंबई, दि.१२ (पीसीबी) : केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते.

वानखेडे यांनी केलेल्या काही धक्कादायक दावे केले आहेत. काही लोक माझ्या हलचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असं वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दोनजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे असं सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

दरम्यान आर्यन खानचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळून देण्यात आलाय. क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसताना त्याला कोठडीत ठेवणे उचित नाही. असे करून त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावले जात आहे. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी सोमवारी विशेष सत्र न्यायालयात केली होती. जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची आवश्यकता नसल्याचे सांगत अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी आठवडय़ाची वेळ देण्याची मागणी एनसीबीतर्फे करण्यात आली. न्यायालयाने मात्र प्रकरणावरील सुनावणी बुधवारी ठेवत एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

२ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानसहीत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या आठही जणांपैकी कोणालाही अद्याप जामीन मंजूर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षांपैकी एक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणामध्ये एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.

मागील आठवड्यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिल्क यांनी आर्यन खान सोबत व्हायरल झालेल्या सेल्फीमधील व्यक्ती ही के. पी. गोसावी असून एक खासगी गुप्तहेर आहे. या व्यक्तीला एनसीबीने छाप्यादरम्यान सोबत राहण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न राष्ट्रवादीने विचारलाय. तसेच भाजपा पदाधिकारी असणारे मनीष भानुशाली हे छापा टाकून आरोपींनी एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाताना एनसीबीच्या टीमसोबत काय करत होते असंही राष्ट्रवादीने विचारलं आहे.

भानुशाली आणि एनसीबी दोघांनाही या प्रकरणामध्ये आरोप फेटाळून लावले आहे. १ ऑक्टोबर रोजी मला माहिती मिळाली की ड्रग्स पार्टी होणार आहे. तर कारवाईदरम्यान अधिक माहिती देण्यासाठी मी एनसीबीसोबत होतो असं भानुशाली म्हणाले आहेत. तर एनसीबीने या दोन्ही व्यक्ती साक्षीदार म्हणून टीमसोबत असल्याचं म्हणत करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय.

WhatsAppShare