मोठी नोकरभरती! महापालिका करणार 4292 पदांची भरती

110

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – राज्य शासनाने महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल चार हजार 292 पदांची भरती  करण्यात येणार आहे. महापालिका ही भरती प्रक्रिया स्वतःच राबविणार असल्याचे प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका आस्थापनेवरील नोकरभरती करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च 35 टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने महापालिकेस दिल्या आहेत. त्यामुळे महापालिका लवकरच नोकरी भरती करणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे.

अत्यावश्यक असलेली पदे प्राधान्याने भरली जाणार आहे. त्यात वैद्यकीय, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा या अत्यावश्यक विभागाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात लिपिक, प्रशासन अधिकारी, अभियंता व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून भरती करत असताना अनेक गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे महापालिकेने भरती प्रक्रिया स्वतःच राबविण्याचा निर्णय घेतला आहे.