मोठी कारवाई: पुण्यात भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने घरफोडी करणारी महिलांची टोळी गजाआड; १४ लाखांचा ऐवज जप्त

95

पुणे, दि. २८ (पीसीबी) – भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने तसेच पाणी पिण्याचे नाटक करुन घराची रेखी करुन नंतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या महिलांच्या टोळीतील चार जणांना अलंकार पोलिसांनी गजाआड केले आहे. तर दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान त्यांच्याकडून शहर परिसरातील तब्बल ९ घरफोड्या उघड झाल्या आहेत.

अनु पवन आव्हाड (वय २५, रा़.वर्ल्ड ट्रेडसमोर, खराडी), प्रकाश अंबादास आव्हाड (वय ३४), पुजा प्रकाश आव्हाड/ पुजा दिलीप गुप्ता (वय ३८), अनिता कैलास बोर्डे (वय ४२, सर्व रा़ दिवा, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़. तर दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे़.

पोलीस उपायुक्त डॉ़.बसवराज तेली यांनी  दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला अगोदर जाऊन परिसरातील बंद बंगले, घर कोणते आहेत़ याची रेकी करायच्या. त्यासाठी त्या भंगार विकत घेत असल्याचा बहाणा करत होत्या. तसेच बंगला खरंच बंद आहे का याची खात्री करण्यासाठी पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने आत जाऊन खातर जमा करायच्या. बंगला बंद दिसल्यावर त्या तिघी आपला साथीदार व लहान मुलांना बोलावून घेत असत़. बंगल्याचे पुढच्या दाराऐवजी मागच्या बाजूला असलेले किचनचे दार, खिडकीचे गज वाकवून त्यातून लहान मुलाला आत पाठवत़. त्यानंतर तो मुलगा दरवाजा उघडून त्यांना आत घेत़. तसेच घरातील सोन्या-चांदिचे दागीण्यांसह इतर काही सामान चोरु पसार व्हायच्या. त्यामुळे तेथे चोरी झाल्याचे बाहेरुन कोणाला समजत नव्हते.

काही दिवसांपूर्वी आरोपी महिला कर्वेनगरमधील स्वप्न मंदिर सोसायटीत रेकी करत होत्या़, तेथील नागरिकांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. अलंकार पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले़ असता सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपींकडून ३३१ गॅ्रम वजनाचे सोने व ७ किलो ५३२ ग्रॅम चांदीच्या लगडी असा एकूण १४ लाख २९ हजार १६२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़. तसेच आरोपींकडून दागिने विकत घेणाऱ्या मुबारक उमर खान (वय ४१, रा़ गोवंडी, मुंबई) यालाही अटक करण्यात आली आहे़.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ़. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, उपनिरीक्षक अंबरिश देशमुख, राजेंद्र सोनावणे तसेच पोलीस कर्मचारी नितीन कांबळे, उस्मान कल्याणी, बाबुलाल तांदळे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे यांच्या पथकाने केली.