मैदाने, क्रीडांगणे आणि जॉगिंग ट्रॅक खुली केल्याबद्दल क्रीडा भारतीकडून राज्य सरकारचे अभिनंदन – कोरोना लढाईत खेळ हे प्रभावी साधन – राज चौधरी

22

पुणे, दि. ८ (पीसीबी) – मैदाने, क्रीडांगणे व जॉगिंग ट्रॅक यांना नागरिकांसाठी मुक्त करावे या साठी क्रीडाभारती ने मा. मुख्यमंत्र्यांना एप्रिल मध्ये एक निवेदन दिले होते.  त्याच बरोबर जनमानसात जागृतीसाठी क्रीडाभारती ने एक मोठा ऑनलाईन सेमिनार घेतला. अनेक मान्यवर खेळाडू, क्रीडा संघटक आणि नागरिक याचा उत्तम प्रतिसाद लाभला. मीडियाने सुद्धा याची दखल घेतली. या सर्वाचा सकारात्मक परिणाम म्हणून राज्य सरकारनेही योग्य दिशेने पाऊल उचलत क्रीडांगणे, मैदाने, जॉगिंग ट्रक, सायकलिंग व अन्य विविध खेळ हे सर्व नागरिकांसाठी खुले केले आहे. या अतिशय उत्तम निर्णयाबद्दल क्रीडा भारतीच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे, असे क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे यांनी म्हटले आहे.

येणाऱ्या जागतिक योगदिवसाचे निमित्त साधून, करोना नियमांचे पालन करत अधिकाधिक नागरिकांनी आंनदासाठी खेळ या संकल्पनेचा स्वीकार करावा, रोज मोकळ्या मैदानावर यावे आणि या द्वारे संपूर्ण समाजाचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम करण्याचे एक प्रभावी आंदोलन उभे करावे, असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने क्रीडाभारतीच्या वतीने केले आहे.

करोना संक्रमणाच्या या अवघड काळात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली प्रतिकारशक्ती (इम्युनिटी पॉवर).  ही प्रतिकारशक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा पण अतिशय प्रभावी मार्ग म्हणजे मैदानी खेळ, योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, जॉगिंग आणि मॉर्निंग वॉक. सध्याच्या परिस्थितीत शरीर आणि मन या दोन्हींना इम्युनिटी बूस्टर ची फार मोठी आवश्यकता आहे. आणि तंदुरुस्त शरीर, तल्लख बुद्धि आणि मनावर संस्कार यासाठी खेळ हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. आंनद मिळवण्यासाठी खेळ या संकल्पनेत सक्षम शरीर आणि तंदुरुस्त मन हे दोन्हीही प्राप्त करण्याची प्रचंड क्षमता आहे. खरे तर कोरोना विरुद्ध लढाईत इम्युनिटी बूस्टर आणि लॉकडाऊन मूळे होणाऱ्या मानसिक कोंडमार्यावर उत्तम उपाय म्हणून सर्व लोकांसाठी व्यायाम आणि खेळाच्या सुविधा मुक्त करणे हे अतिशय उपयुक्त आणि आवश्यक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

WhatsAppShare