मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

354

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – अभिनेत्री मेघा धाडे बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोची पहिली विजेती ठरली आहे. लोणावळामध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत मेघाने पुष्कर जोगवर मात केली. जवळपास गेल्या शंभर दिवसांपासून चाललेला हा प्रवास अखेर संपला आणि या प्रवासात सर्वात जास्त ज्या व्यक्तीची चर्चा झाली, तीच व्यक्ती विजेती म्हणून सर्वांसमोर आली. १८ लाख ६० हजार रुपये तिला बक्षिसाची रक्कम म्हणून मिळाली आहे.

मराठी बिग बॉसच्या घरात असो किंवा बाहेर सतत मेघाची चर्चा झाली. घरात असा क्वचितच कुणी स्पर्धक असेल, ज्याच्यासोबत तिचे भांडण झाले नाही. प्रत्येकावर हक्क गाजवणे, इतरांना स्वत:पेक्षा कमी लेखणे या स्वभावामुळे ती सर्वांच्या निशाण्यावर असायची. असे असले तरी मेघा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसली. बिग बॉस मराठीच्या घरातील मेघाचे एकंदर वागणे आणि तिचा वावर यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळाली.