मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जाळ्या असलेलल्या बेडचे बांधकाम चिखली, भाटनगरला सुरू

26

– जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांच्या मागणीची महापालिका प्रशासनाने घेतली दखल

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात कोरोना मृतांवर सर्व स्मशानांतून सन्माणपूर्वक अंत्यसंस्कार होत नसल्याचा अत्यंत गंभीर प्रकार जेष्ठ नगरसेविक सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. मृतांची संख्या वाढत असल्याने अधिक प्रमाणात जाळीचे बेड ताबडतोब उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि स्थापत्य विभागाने त्याची तात्कळ दखल घेतली आणि सर्वेक्षण करून हे काम सुरू केले आहे. चिखली येथे पाच आणि भाटनगरला दोन जाळीचे बेड तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू असून आठवडाभरात हे नवीन जाळीचे बेड अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध होणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत कठीण होत चालली आहे. गेल्या आठ दिवसांत रोज सरासरी २५०० नवीन रुग्ण वाढत आहेत आणि शहरातील किमान ५०-५५ तर बाहेरील ३०-४० मृत्यू होतात. सर्व मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी सुरवातीला फक्त चार स्मशाने उपलब्ध होती. स्मशानात जागा कमी पडत असल्याने परिसरातील जमिनीवरच सरण रचून अंत्यसंस्कार सुरू असल्याचे स्वतः जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी पाहिले. हे दृष्य अत्यंत भेदक आणि मनाला वेदना देणारे होते. किमान मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी शेड अपुरे पडत असल्याने जादाची व्यवस्था म्हणजे जाळ्याचे बेड, नवीन ओटे तयार कऱण्याची नितांत गरज होती. महापालिका प्रशासनाने त्याबाबात तात्काळ कृती करावी आणि शहरातील किमान मोठ्या स्मशानांतून ओटे बांधावेत, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली होती.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात सिमा सावळे यांनी पूर्ण परिस्थिती विशद केली होती. आठवड्यापूर्वी एका कार्यकर्त्याच्या अंत्यसंस्कारासाठी भाटनगर स्मशानात सीमा सावळे या उपस्थित होत्या. त्यावेळी विद्तदाहिनी शिवाय शेजारच्या शेडमध्ये चार जाळ्यांच्या बेडवर चार प्रेतांवर अंत्यसंस्कार सुरू होते. शेडमध्ये जागा नसल्याने अखेर परिसरातील जमिनीवर जिथे जागा मिळेल तिथे एकूण १४ चिता जळत होत्या. अन्य पाच कोरोना मृत देह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत रांगेत होते. जे प्रतिक्षेत होते त्यांची तिरडी अथवा स्ट्रेचर खाली जमिनीवरच ठेवली होती. किमान मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीच्या प्रेतावर सन्मानाने अंत्यसंस्कार झाले पाहिजेत अशी सर्वांचीच भावना असते. इथे जमिनीवरच सरण रचलेले आणि उर्वरीत प्रेते रांगेत असलेले दृष्य पाहूण खूपच वाईट वाटले, अशी भावना सावळे यांनी महापालिका आयुक्त पाटील यांच्याकडे व्यक्त केली होती.

भाटनगर या एका स्मशानाची माहिती घेतली. १ ते २३ एप्रिल दरम्यान या ठिकाणी ७४३ प्रेतांवर अंत्यसंस्कार झाले, तसेच निगडी येथील स्मशान भुमीत याच कालावधीत ५६० प्रेतांवर अंत्यसंस्कार झाले. रोज सरासरी ४० ते ६० अंत्यसंस्कार होतात. एका प्रेताला चितेवर ठेवल्यावर पूर्ण रक्षा होण्यासाठी किमान दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो. संकट पाहता त्यावर तातडीने उपाय योजण्याची नितांत गरज आहे असेही सीमा सावळे यांनी निदर्शननास णून दिले होते. भाटनगर स्मशानातील वास्तव जसे होते कमी अधिक प्रमाणात भोसरी, निगडी, सांगवी या स्मशानातही होते. कुठल्याही व्यक्तीचे प्रेत स्मशानात आणल्यावर त्यावर तत्काळ सन्मानाने अंत्यसंस्कार केले पाहिजेत. मृतांची वाढती संख्या पाहता पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्मशानात प्रेतांना ठेवण्यासाठी काही जादाचे ओटे तत्काळ बांधण्यात यावेत. त्याशिवाय जमिनीवर सरण रचून ते ढासळते आणि प्रेत अर्धवट जळलेल्या अवस्थेत राहू शकते. हे संभाव्य धोके टाळण्यासाठी जाळ्या असलेल्या बेडची संख्या वाढविण्यात आली पाहिजे. कुठल्याही प्रेताची अवहेलना होऊ नये, त्याला शेवटचा निरोप सन्मानाने दिला पाहिजे, हा आपला संस्कार आहे. त्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यासाठी जे कर्मचारी आहेत त्यांनी पीपीई किट पुरविण्यात यावीत आणि त्याची सक्ती करावी, अशीही मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली होती.आता त्या सर्व मागण्यांची प्रशानाने पूर्तता केली आहे.

WhatsAppShare