मूल्यसंवर्धन ही काळाची गरज – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

20

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – जाती धर्माच्या नावाने अगदी पद्धतशीरपणे समाजामध्ये विद्वेषाचे वातावरण पसरविले जात आहे. त्यामुळे असुरक्षिततची भावना निर्माण होणे साहजिक आहे. त्यावर मात करण्यासाठी मूल्यसंवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.  

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान या संस्थाच्यावतीने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या एकसृष्टीपूर्तीनिमित्त आयोजित अभिष्टचिंतन समारंभामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी रोकडे यांनी निष्ठापूर्वक केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

विसंवाद माणसाला अधोगतीकडे, तर सुसंवाद प्रगतीकडे घेऊन जातो. जिद्द्, चिकाटी, निरपेक्षता, सकारात्मकता आणि विश्वासार्हता यामुळे आयुष्य यशस्वी होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश रोकडे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पगारिया म्हणाले.

यावेळी प्रकाश जवळकर, महेंद्र भारती, सदाशिव कांबळे, चंद्रकांत वानखेडे, मधुश्री ओव्हाळ, सुनील यादव, चंद्राकांत धस, शिवाजीराव शिर्के यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. संगिता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत रोकडे यांनी आभार मानले.