मुहुर्त ठरला: नारायण राणे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते होणार

114

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – बऱ्याच दिवसांपासून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत असलेल्या खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १६ ऑगस्टला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे.

मराठीत ‘झंझावात’ तर इंग्रजीत “नो होल्ड बार” असे या आत्मचरित्राचे नाव आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती राहणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राणे यांच्या आत्मचरित्र्याच्या प्रकाशनाबाबत चर्चा होत होती. राणे यांच्या या आत्मचरित्रात त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही लक्ष्य केले असल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी “नो होल्ड बार” या इंग्रजीतल्या आत्मचरित्राची पाने उघड झाली होती. यात उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करित ‘राणे यांना पक्षातून काढा, अन्यथा मी मातोश्री सोडून जाईन’, अशी धमकी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याचा गौप्यस्फोट झाला होता.