‘मुस्लीम हॉटलमध्ये बिर्याणी खायला नको’, असे हे धर्मगुरु का म्हणाले…

107

कोची, दि.२३ (पीसीबी) – केरळमधील एका पादरींनी केलेल्या धार्मिक वक्तव्याच्या विरोधात काही नन आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळं हे आंदोलन आता या चर्चशी संबंधित धार्मिक महिला आणि पुरुष धार्मिक नेते यांच्यातील संघर्षाचं प्रतीक बनलं आहे.

यापूर्वीचा इतिहास पाहता आजवर कधीही या चर्चमध्ये महिलांनी रविवारच्या सामूहिक उपदेशाला विरोध केला नव्हता किंवा त्यावर बहिष्कार टाकलेला नव्हता. पादरींनी एका विशिष्ट समूहातील लोकांबरोबर व्यावसाय करू नये, असा सल्ला दिल्यानंतर हे आंदोलन आणि बहिष्कार करण्यात आला. गेल्या आठवड्यात कॅथलिक ख्रिश्चनांची संस्था ‘सायरो-मालाबार कॅथलिक चर्च’ मधील पाला बिशप मार जोसेफ कल्लारांगट यांनी एका धार्मिक उपदेशादरम्यान, “लव्ह जिहाद” प्रमाणे “नार्कोटिक्स जिहाद” शब्दाचा वापर केलाच. मात्र, त्याचबरोबर सेंट फ्रान्सिस कॉनव्हेंटमध्ये ननसमोर केलेल्या प्रवचनामध्ये या पादरींनी आणखी एक पाऊल पुढं टाकलं.

“आम्ही त्यांना काही लोकांच्या चुकांसाठी, संपूर्ण मुस्लीम समुदायाला दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं सांगितलं. असे लोक सर्व धर्मात आहेत. तुम्ही मुस्लीम हॉटलमध्ये बिर्याणी खायला नको तसंच मुस्लिमांच्या दुकानावर जाऊ नये किंवा मुस्लिमांच्या रिक्षामध्ये प्रवास करू नये,” असं उपदेशादरम्यान पादरी म्हणाल्याचं सिस्टर अनुपमा यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.

“आम्ही त्यांना म्हटलं की, आम्ही विद्यार्थी आहोत आणि आम्हाला मुस्लिमांच्या रिक्षामध्ये प्रवास करण्यात काहीही अडचण आलेली नाही. तसंच आमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांमुळंही काही त्रास झालेला नाही. पण तरीही पादरी त्यांच्या नार्कोटिक्स जिहाद आणि इतर वक्तव्यांवर अडून राहिले. त्यांचं हे वक्तव्य पोपच्या मतांच्याही विरोधी आहे,” असंही सिस्टर अनुपमा म्हणाल्या.

सिस्टर अनुपमा, सिस्टर एल्फी, सिस्टर एंकिट्टा आणि सिस्टर जोसेफिन याच सगळ्या ननच्या नेतृत्वात सप्टेंबर 2018 मध्ये एक ऐतिहासिक आंदोलन करण्यात आलं होतं. त्यांनी ननच्या बलात्काराचा आरोप असलेल्या एका बिशप दर्जाच्या धार्मिक नेत्याला चर्चमधील पदावर राहण्यास विरोध केला होता.

ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी आहेत. पण चर्चमधील वातावरणात कशाप्रकारे बदल होत आहे, हे यावरून लक्षात येतं. धर्मिक घडामोडींशी संबंधित या महिला अनेक मार्गांनी पादरींचा दबाव झुगारून विरोध करत आहेत.
लैंगिक शोषणाचं प्रकरण असो, छळाचं असो किंवा नन असलेल्या महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक असो, या महिला विरोध करायला मागं हटत नाही, असं एक नन म्हणाल्या.

“जवळपास सर्वच धार्मिक संस्था आणि धर्माचं पालनं करण्याच्या पद्धती या मूळतः पितृसत्ताक आणि जाचक अशाच आहेत. महिला या यंत्रणेमध्ये अखेरच्या टोकालाच असतात. आदेशाच्या नावाखाली होत असलेल्या लैंगिक शोषणाची किंवा कधी कधी त्यापेक्षाही अधिक अत्याचाराची त्यांनी तक्रार केली आहे. बिशप मुलक्कल याचं उदाहरण आहेच,” असं सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील रेबेका मेमन जॉन यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.

WhatsAppShare