मुळशीतील भाजप माथाडी कामगार संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षाला धमकावण्यासाठी घरासमोर गोळीबार

137

मुळशी, दि. ११ (पीसीबी) – माथाडी संघटनेच्या वर्चस्व वादातून मुळशी येथील बौद्धवस्तीत राहणाऱ्या भाजपच्या माथाडी कामगार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष दशरथ बाळू चव्हाण यांच्या घरासमोर आठ ते दहा हल्लेखोरांनी गोळीबार करुन त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवार (दि.१०) रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी पौड पोलिसांनी श्रीवर्धन उर्फ दादा रमेश तिकोना (वय २२) याला अटक केली असून शेखर बलकवडे या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान आठ ते दहा हल्लेखोरांनी मुळशी येथील बौद्धवस्तीत राहणारे भाजपचे माथाडी कामगार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या घरासमोर गोळीबार करुन त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच गावातील २० ते ३० तरुणांनी घटनास्थळी धाव घेत त्यातील एका हल्लेखोराला बेदम मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्याचे इतर साथीदार घटना स्थळावरुन पसार होण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, चव्हाण यांना धमकावण्यासाठी व माथाडी संघटनेच्या वर्चस्व वादातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. पौड पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.