मुले चोरी होण्याच्या अफवेमुळे कर्नाटकातील गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून हत्या

33

बिदर, दि. १५ (पीसीबी) – मुले चोरी होण्याच्या अफवांमुळे कर्नाटकातील बिदरमध्ये एका गुगलच्या इंजिनीअरला जमावाने बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. तर इतर तिघांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

मोहम्मद आजम अहमद (वय ३२, रा. हैदराबाद, मलकपेट) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मुरकी येथी राहणाऱ्या बशीर, सलमान आणि अकरम असे वाचवण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिदरच्या मुरकी येथे राहणाऱ्या बशीर, सलमान आणि अकरम या तीन मित्रांना भेटण्यासाठी मयत मोहम्मद बिदरला आला होता. मित्रांचा निरोप घेत असताना त्यातील एका मित्राने काही लहान मुलांना चॉकलेट वाटायला सुरुवात केली. त्याचवेळी व्हॉट्सअॅपवर मुले चोरी झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र जमून या चारही जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाकडून काही तरुणांना मारहाण केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने गर्दीत घुसून जमावाला पांगवले आणि या तरुणांची जमावाच्या ताब्यातून सोडवणूक केली. या चारही गंभीर जखमींना बिदरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मोहम्मदचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे. तसेच व्हॉट्सअॅपवर मुल चोरी झाल्याची अफवा पसरविणाऱ्या ग्रुप अॅडमिनलाही अटक करण्यात आली आहे. शिवाय व्हॉट्सअॅपवर मुले चोरी झाल्याचे बनावट फोटो टाकणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.