मुलुंडमध्ये औषध व्यवसाय परिषदेच्या कार्यालयाबाहेर चेंगराचेंगरी; ४ जखमी

104

मुलुंड, दि. ३ (पीसीबी) – मुलुंडमध्ये महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या कार्यालयाबाहेर आज (शुक्रवारी) सकाळी चेंगराचेंगरीची घटना घडली. यात चार जण जखमी झाले असून यातील अनिकेत श्रृंगारे (वय ३०) या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुलुंड पश्चिमेला महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे कार्यालय आहे. या कार्यालयात ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी केली जाते. शुक्रवारी देखील ऑफलाइन नोंदणीसाठी कार्यालयाबाहेर गर्दी झाली होती. सकाळी साडे नऊला कार्यालय सुरु होते. कार्यालयाबाहेर लोक रांगेत असताना दहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

पावसात कागदपत्रे भिजू नये, यासाठी तिथे धावपळ सुरु झाली. यातूनच चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर फोर्टीस तर अन्य तिघांवर अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.