मुलीच्या वाढदिवशीच वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलीसाचा मृत्यू

1065

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी येथे वाहतूक कोंडी सोडवताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वाहतूक पोलीसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास तळोजा एमआयडीसी येथे घडली.

अतुल घागरे असे या मृत्यू झालेल्या पोलीसाचे नाव आहे.  घागरे यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. मात्र आजच्या दिवशीच ही दुखद घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास तळोजा एमआयडीसीत खड्डयांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अतुल घागरे हे वाहतूक कोंडी सोडवत होते. खड्डे ओलांडताच वाहने सुसाट निघत होते. अशाच एका वाहनचालकाने घागरे यांना जोरदार धडक दिली. घागरे यांना मदत करण्याऐवजी चालकाने वाहनासह तिथून पळ काढला. घागरे जखमी झाल्याचे काही सतर्क वाहनचालकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती वाहतूक पोलिसांना दिली. घागरे यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घागरे यांची पत्नीही पोलीस विभागात असून नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्या कार्यरत आहेत. आजच घागरे यांच्या मुलीचा वाढदिवस आहे यामुळे वाढदिवशीच त्या चिमुरडीच्या पित्याचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.