मुलाला घेऊन संसदेत आलेल्या महिला खासदाराला काढले बाहेर

179

केनिया, दि. ८ (पीसीबी) – बाळासह संसदेत येणाऱ्या महिला खासदारांची जगभरात चर्चा होत असताना पाच महिन्यांच्या मुलासह संसदेत आलेल्या एका महिला खासदाराला बाहेर काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. केनियाच्या संसदेत हा प्रकार घडला असुन, झुलेईका हसन असे त्या महिला खासदाराचे नाव आहे. कौटुंबिक अडचणींमुळे आपल्याला मुलासह संसदेत यावे लागले, असे हसन यांचे म्हणणे आहे.

संसद सदस्याशिवाय इतरांना सभागृहात प्रवेश करण्यास केनियाच्या संसदेने बंदी घातली आहे. यात लहान मुलांनाही मुभा देण्यात आलेली नाही. मात्र, खासदार झुलेईका हसन या आपल्या पाच महिन्यांच्या मुलाला घेऊन संसदेच्या कामकाजाला आल्या होत्या. याला सभापती क्रिस्तोफर ओमुलेले यांनी आक्षेप घेत हसन यांना बाहेर जाण्याची सूचना केली. तसेच सभागृहात यायचे असेल तर मुलाला बाहेर ठेवून या, असेही सांगितले. त्यामुळे हसन सभागृहाबाहेर पडल्या. यावेळी काही पुरूष खासदारांनी त्यांची ही कृती लज्जास्पद असल्याच्या घोषणा दिल्या.

आपण मुलाला घरी ठेवून संसदेत येण्याचा खुप प्रयत्न केला. पण, काही आपतकालीन स्थिती निर्माण झाल्यामुळे मी मुलाला सोबत घेऊन आले. जर संसदेच बालसंगोपन गृह असते, तर तिथे मी बाळाला ठेवू शकले असते. जास्तीत जास्त महिलांनी संसदीय प्रणालीमध्ये सहभागी व्हावे असे संसदेला वाटत असेल, तर कौटुंबिक वातावरणनिर्मिती करायला हवी, असे मत हसन यांचे आहे. तर बाळाची काळजी घेण्यासाठी संसदेने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच कामकाजाच्या वेळी मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिला खासदार आया आणु शकतात. तशी परवानगी आहे, अशी माहिती उपसभापती मोसेस चेबोई यांनी दिली.