मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने सांगवीत आईचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
1418

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – मुलाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे धक्का बसलेल्या आईचाही  हृदयविकाराच्या  झटक्याने मृत्यू झाला. ही ह्दयद्रावक घटना  सोमवारी (दि.४) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सांगवीत घडली. मुलाच्या आणि आईच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांगवीत राहणाऱ्या ३८ वर्षीय तन्मय दास यांने आत्महत्या केली, तर या धक्क्याने त्यांची ६५ वर्षीय आई शुक्ला दास यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  पतीच्या निधनानंतर शुक्ला  मुलासोबत सांगवीत राहत होती. तन्मयने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडले असून तो मनोरूग्ण  होता.

सोमवारी दुपारी शुक्ला दास यांनी तन्मय याला रुग्णालयात  नेले होते. तिथे डॉक्टरांच्या भीतीने पळून गेलेले तन्मय रात्री दहानंतर घरी परतला.  त्यानंतर रात्री ११ वाजता तन्मयने  स्वतःचा गळा चिरुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक्सटेन्शन बोर्डची वायर पंख्याला बांधून गळफास घेतला. तन्मयच्या ओझ्याने पंख्यासह तो मृतावस्थेत खाली पडला. ही घटना पाहून आई शुक्ला यांना हृदयविकाराचा धक्का बसला. या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला.

अधिक तपास सांगवी पोलीस करत आहे.