मुलगी अशुभ म्हणून आईनेच केला सात महिन्यांच्या मुलीचा खून

259

दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – मुलगी जन्मल्यापासून घरामधील अनेकांच्या तब्बेतीसंदर्भातील आणि आर्थिक अडचणी वाढल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या सात महिन्यांच्या मुलीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवार (दि.२० ऑगस्ट) दिल्लीमध्ये घडली.

आदीबा (वय २७) असे पोटच्या सात महिन्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.  दिल्ली पोलिसांनी तिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी जन्मल्यापासून घरामधील अनेकांच्या तब्बेतीसंदर्भातील आणि आर्थिक अडचणी वाढल्याने आदीबाने तिच्या पोटच्या सात महिन्यांच्या मुलीची सोमवारी राहत्या घरात ओढणीने गळा आवळून खून केला. आदीबाने सुरवातीला आपली मुलगी पाण्यात बुडल्याचे सांगून तिला दिल्लीतीलच मुच्छलचंद रुग्णालयात दाखल केले. मुलीची नाजूक परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पोलिसांना या प्रकाराबद्दल कळवले. मुलीला दाखल करुन घेतल्यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला. मात्र मुलीच्या गळ्यावर व्रण दिसल्याने पोलिसांना हा अपघात नसल्याचा संशय आला. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शिवविच्छेदनाच्या अहवालानुसार या मुलीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याने उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आदिबाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने आपला गुन्हा कबुल केला.