मुलगा व्हावा म्हणून विवाहितेवर अघोरी उपाय

45

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी सासरच्या लोकांनी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तिच्या डोक्यावर लिंबू कापणे, चहा, नाष्ट्यात अंगारा टाकून खाऊ घालणे असे अघोरी प्रकार केले. तसेच माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा छळ केला. हा प्रकार 5 डिसेंबर2019 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडला.

पती प्रशांत रमेश लोहार (वय 32), सासू मीना रमेश लोहार (वय 50), नणंद हर्षदा भूषण मेहता (वय 28, सर्व रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 31 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 3) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, सासू आणि नणंद यांनी विवाहितेकडे लग्नातील मानपानासाठी माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून तिचा छळ केला. पतीनेही विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली.

विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी राम मामा महाराज (रा. रहाटणी) याच्या सांगण्यावरून सासूने विवाहितेच्या डोक्यावर लिंबू कापणे, महाराजांनी दिलेला अंगारा चहा, नाष्ट्यामधून खाऊ घालणे असे अघोरी प्रकार केले.

किशोर पंडित (रा. वाघोली) या महाराजाच्या सांगण्यावरून विवाहितेला रात्र-रात्र एकाच कुशीवर झोपण्यास भाग पाडले. तसेच ‘तू मला घटस्फोट दे. नाहीतर तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन’ अशी विवाहितेला धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare