मुदतीत बसेसचा पुरवठा न करणाऱ्या कंपन्यांना नोटीस; पीएमपी संचालकांच्या बैठकीत निर्णय

101

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पीएमपीसाठी ४०० सीएनजी बस आणि १२५ इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. पण या बसेसचा दिलेल्या मुदतीत कंपनीकडून पुरवठा करण्यात आलेला नाही. याबाबत संबंधित कंपनीकडे खुलासा मागितला आहे. तसेच बसेसचा पुरवठा करण्यासाठी संबंधित कंपन्यांना नोटीस पाठविण्याचा निर्णय आज (गुरूवार) झालेल्या पीएमपी संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला.

पीएमपी संचालकांची बैठक आज सकाळी साडे दहाच्या वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात पार पडली. या बैठकीला महापौर राहूल जाधव, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, सीआयआरटीचे संचालक कॅप्टन राजेंद्र सणेर पाटील, पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.

४०० सीएनजी बसपैकी पुण्यासाठी २४० बस आणि पिंपरी-चिंचवडसाठी १६० बस घेण्यात येणार आहेत. या बसची किंमत ४८ लाख ४० हजार इतकी असून लखनौ येथील टाटा मोटर्स कंपनीला या बसची ऑर्डर देण्यात आली आहे. ४०० बसपैकी ६५ बस निगडी डेपोमध्ये आल्या आहेत. पण या बसचे आरटीओ पासिंग झालेले नाही. या बसमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा वापरणे बंधनकारक आहे.

त्याचबरोबर पीएमपीच्या ताफ्यात १२५ इलेक्ट्रीक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडसाठी ५० बस आणि पुण्यासाठी ७५ बस घेण्यात येणार आहेत. ४८ बस आल्या असून आरटीओ पासिंग झालेले नाही. या बसची ऑर्डर हैदराबाद येथील ओलेक्ट्रा कंपनीला देण्यात आली आहे. या बस ५८ रूपये ५० पैसे प्रतिकिलोमीटर भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.