मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चाच मान्य नाही; लातूरमधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निषेध

146

लातूर, दि. २९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी आज (रविवारी)  दुपारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी काही मराठा समन्वयकांची बैठक घेतली . मात्र, या बैठकीशी आमचा काहीही संबंध नाही, असे सांगून या बैठकीला जाणाऱ्यांचा निषेध मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.

लातूर येथील राहिचंद्र मंगल कार्यालयात आज (रविवार) सकाळी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. तर दुसरीकडे  मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर काही समन्वयकांनी सरकारशी चर्चा केली .  याबाबत बैठकीत समन्वयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही चर्चाच आम्हाला मान्य नाही. अशा चर्चेच्या माध्यमातून सरकार हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. चर्चला जाणाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठोस निर्णय घेवूनच चर्चा करावीष अशी मागणीही यावेळी करण्यात आली.  काही लोकांना हाताला धरून सरकार चर्चा करत आहे. यातून मराठा समाजाला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.  सरकारने  मराठा समाजासाठी ठोस निर्णय घेवूनच सर्व समन्यवकांशी चर्चा करण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली.