मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची महापूजा करू देणार नाही – मराठा क्रांती मोर्चा

67

पंढरपूर, दि. १७ (पीसीबी) – राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आता थेट मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा न करु देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पंढरपूर येथे झालेल्या राज्य बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे ५८ मोर्चे काढण्यात आले. मात्र, सरकारने याची दखल घेतलेली नाही, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला. आरक्षणाचा निर्णय होइपर्यंत मुख्यमंत्र्याना आषाढीची महापूजा करु देणार नाही, असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजाभाऊ गायकवाड यांनी सांगितले.

पंढरपूरातील श्रीराम मंगल कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा अशा संघटनांसह सर्वच पक्षातील मराठा समाजाचे प्रतिनिधी  उपस्थित होते. कोपर्डी घटनेतील पीडीत मुलीच्या कुटुंबानेही या बैठकीला हजेरी लावली होती.