मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्रीनंतर ३९ बंडखोर आमदारांच्या भेटीला

126

पणजी, दि. १ (पीसीबी)- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी शपथविधीच्या कार्यक्रमानंतर मंत्रीमंडळाची पहिली बैठक संपल्यावर रात्री उशीरा थेट गोवा गाठले. शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार गोव्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्रीनंतर पोहोचले. यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं.

त्यापूर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलवरुन शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांसोबत चर्चा केली होती. या व्हिडीओ कॉलवरील चर्चेदरम्यानचे काही फोटो शिंदे यांनी ट्विटरवरुन शेअर केले होते.