मुख्यमंत्री बदलाच्या शक्यतेची बातमी प्रसिद्ध केल्याने संपादकाविरुद्घ देशद्रोहाचा गुन्हा दाखल

0
353

प्रतिनिधी,दि.१३ (पीसीबी) : गुजरात मध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावर टिका होत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता असल्याची बातमी अहमदाबाद येथील एका न्युज पोर्टलने प्रसिद्ध करणाऱ्या संपादका विरुद्ध चक्क देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपादकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुजरात मध्ये मे मागील १५ – २० दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. अहमदाबाद व सुरत मध्ये परप्रांतीय कामगार रस्त्यावर उतरले व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथील ‘फेस ॲाफ नेशन’ या न्युज पोर्टलवर दि ७ मे रोजी “ मनसुख मांडवीया यांना हायकमांडने बोलवले, गुजरातमध्ये नेतृत्व बदलाची शक्यता “ या मथळ्याखाली मुख्यमंत्री बदलाच्या शक्यतेचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मनसुख मांडवीया हे केंद्र शासनात रसायन व खते या खात्याचे राज्यमंत्री आहेत. तसेच ते गुजरातचे राज्यसभा सदस्य आहेत. दरम्यान गुजरात पोलिसांनी न्यूज पोर्टलचे संपादक धवल पटेल यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपादकाची कोरोना चाचणी करण्यात आली होती व अद्याप रिपोर्ट आला नसल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु अटकेची कारवाई रिपोर्ट आल्यानंतर करण्यात येणार आहे.

या प्रकरणाबाबतीत माहिती देताना अहमदाबादचे सहाय्य पोलिस आयुक्त बि. व्ही. गोहील म्हणाले की, मुख्यमंत्री बदलाची बातमी प्रसिद्ध केल्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण केल्याबद्दल न्यूज पोर्टलच्या संपादक धवल पटेल यांच्या विरोधात अहमदाबाद क्राईम डिटेक्शन युनिटच्या वतीने आयपीसीचे कलम १२४ ( देशद्रोह) व आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५४ (खोटी चेतावणी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अहमदाबाद मधील एसविपी रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे, रिपोर्ट आल्यावर अटकेची कारवाई पुर्ण करण्यात येईल, असे एसीपी गोविल गोहील यांनी सांगितले. मात्र अशा प्रकारे देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने गुजरात पोलिस प्रशासन व भाजपा सरकार विरुद्ध सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.