मुख्यमंत्री बदलल्यास भाजपचा पाठिंबा काढणार; ६ अपक्ष आमदारांचा इशारा  

955

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मुख्यमंत्री बदलले तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ, असा इशारा राज्यातील ६ अपक्ष आमदारांनी दिला आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, त्यांना पदावरुन हवटले, तर आपण सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून अपक्ष आमदार असून मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. तर राणा यांच्याबरोबर गणपतराव गायकवाड, हिरालाल चौधरी, किशनराव जाधव, माधवराव फड या आमदारांनीही राणा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्रात जे चित्र आहे, ते राजकीय नेतृत्वाचे अपयश आहे. त्यातूनच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा महाराष्ट्रात रंगलेल्या  नाही, तर भाजपमध्येच रंगलेल्या आहेत, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.