मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, नारायण राणे, सुरेश प्रभू एकाच विमानात!

1684

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पहिली हवाई चाचणी १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि खासदार नारायण राणे या सगळ्यांना घेऊन एक विमान मुंबईकडून सिंधुदुर्गाकडे झेपावणार आहे. या विमानाच्या उड्डाणासोबतच २०१९ च्या निवडणुकांत युतीचे राज्यात पुन्हा सेफ लॅण्डिंग होईल की नाही त्याबाबत राजाच्या राजकारणात खुमासदार चर्चा रंगली आहे. पहिल्या हवाई चाचणीत युतीच्या प्रमुख नेत्यांसोबत प्रभू आणि राणे अशी दोन मंडळी सोबत असली तरी पुढील राजकीय उड्डाणात ही मंडळी सोबत असतील की त्यांना टाचणी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर अर्थात १२ सप्टेंबर रोजी विमानाच्या उड्डाणाची चाचणी होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली जात असून १२ सप्टेंबरला एक खास विमान मुंबईहून सिंधुदुर्गला रवाना होणार आहे. या विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू तसेच माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे असणार आहेत. राणे यांनी आजवर चिपी विमानतळाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांना वगळण्यात येणार नाही. चिपी विमानतळावर एक छोटेखानी कार्यक्रमही होणार आहे.

तळकोकणात होणाऱ्या या कार्यक्रमाबाबत जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे दोन नेते नेते सुमारे दीड वर्षांपूर्वी सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे राजकीय समीकरण जुळवून आणले होते. मात्र त्यानंतर नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत शिवसेनेने घेतलेला जोरदार आक्षेप पाहता हे दोन नेते पुन्हा एकत्र व्यासपीठावर येणार का, याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सुरेश प्रभू यांनीही सोयीस्करपणे शिवसेनेला गाफील ठेवत भाजपचा आसरा घेतल्याने त्यांचेही शिवसेनेसोबत फारसे सख्य नाही. त्यात शिवसेना व भाजप आगामी निवडणुकांना युती म्हणून सामोरे जाणार की नाही हे देखील अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे चिपीवर या सर्व नेत्यांचे सेफ लॅण्डिंग होत असले, तरी राज्यात युतीच्या विमानाचे लॅण्डिंग होणार का याविषयी उत्सुकता आहे. शिवाय या विमानाच्या चाचणीच्या कार्यक्रमात फडणवीस, ठाकरे यांच्यासाबत राणे आणि प्रभू असले तरी नंतर आगामी निवडणुकांसाठी राजकीय ढगात युतीचे विमान झेपावल्यास प्रभू नेमक्या कोणत्या पक्षाकडून असतील तसेच युतीमध्ये राणे यांचा स्वाभिमानी पक्ष असेल की त्याला टाचणी बसेल अशा अनेक कंगोऱ्यांवर चर्चा रंगली आहे.