मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; विकासकामांचे भूमीपूजन आणि कार्यकर्ता मेळावा होणार

212

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. २३) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. ते या दौऱ्यात महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करणार असून, पक्षाचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आणण्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आठ-नऊ महिन्यांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने कामाला लागले आहेत. प्रत्येक मतदारसंघात जिंकणारा उमेदवार देण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यात युती होणार की नाही, याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे. दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ जुलै रोजी पुण्यात बैठक घेऊन जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.

आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री सोमवारी (दि. २३) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करणार आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, वेस्ट-टू-एनर्जी या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अन्य काही विकासकामांचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांचा मेळावाही घेण्यात येणार आहे.

या मेळाव्यात स्वतः मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मेळाव्याला आणण्याचे पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयार असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होणार आहे.