मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सासरवाडीच्या पाहुण्याची उपस्थिती

264

महाराष्ट्र, दि.५ (पीसीबी) –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आधीच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णय आणि योजनांचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक प्रकल्प आणि कंत्राटांचा आढावा घेण्यासाठी उद्धव अनेक बैठकी घेत आहेत. मात्र सोमवारी उद्धव यांनी घेतलेली बैठक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ही बैठक चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे या सरकारी बैठकीमध्ये उद्धव यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचा भाचा वरुण सरदेसाईही उपस्थित होता.

उद्धव यांनी सोमवारी पर्यटनासंदर्भातील धोरणांचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला मंत्रालयातील अधिकारी आणि संबंधित खात्याचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र त्याचबरोबर रश्मी यांचा भाचा वरुणही उपस्थित होता. सरकारी बैठकीला उद्धव यांच्या सासरवाडीतील सदस्याची उपस्थिती अधिकाऱ्यांच्याही चर्चेचा विषय ठरली. मात्र उद्धव यांच्या विनंतीवरुन आपण बैठकीला आलो होतो असं स्पष्टीकरण वरुणने दिले आहे.

मुंबई आणि उपनगरातील पर्यटनासंदर्भातील धोरणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये वरुणला पाहून अनेक अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले. “लोकप्रतिनीधी किंवा सरकारी अधिकारी नसणारी व्यक्ती सरकारी बैठकीला कशी काय उपस्थित राहू शकते. ही व्यक्ती पर्यटन श्रेत्रातील तज्ज्ञ आहे असंही नाही. असं असतानाही त्या व्यक्तीला बैठकीला बोलावणे किती योग्य आहे,” असा सवाल एका अधिकाऱ्याने उपस्थित केला. वरुण सध्या शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव आहेत. मंत्रालयातील या बैठकीआधी युवासेनेची बैठकही पार पडली. मात्र या दोन्ही बैठकींचा काहीच संबंध नसल्याने वरुणने स्पष्ट केलं. “या बैठकीमध्ये कोणतीही गोपनीय माहिती उघड करण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत: ही बैठक बोलवली होती. त्यांच्या सांगण्यावरुनच मी बैठकीला उपस्थित होतो,” अशी प्रतिक्रिया वरुणने दिली आहे.

WhatsAppShare