मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजीनामा देणार

0
53

नवी दिल्ली, दि. १५ – मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी आपण येत्या दोन दिवसांमध्ये दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नवी खेळी खेळल्याची चर्चा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवार यांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्यावर काही निर्बंध टाकले होते. मुख्यमंत्री म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित प्रस्तावाला नायब राज्यपालांकडून मंजुरी घेण्याची अट घातली होती. याशिवाय, केजरीवाल यांना दिल्लीतील सचिवालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आता थेट जनतेमध्ये जाणार असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. त्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू. जनतेला मी इमानदार वाटत असेल तर त्यांनी मला निवडून द्यावे. मी बेईमान असेल तर जनतेने मला निवडून देऊ नये, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. या काळात आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीत माझ्याऐवजी आपमधील दुसरा कोणत्यातरी नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. अरविंद केजरीवार यांच्या या घोषणेचे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि दिल्लीच्या जनतेमध्ये काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.