मुख्यमंत्रीच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार- सुप्रिया सुळे

239

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – भाजपाच्या जाहीरनाम्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा विषय होता. परंतु सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण मिळाले नाही. कारण मुख्यमंत्र्यांना सत्तेत आल्यावर न्यायालय आठवते , निवडणुकीच्या प्रचारात न्यायालय आठवलं नाही, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला. तसंच गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्रीच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार आहेत असा आरोप करत झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज (बुधवारी) मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक दिली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहनही मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे. समन्वयकांकडून सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम होणार नसल्याचं सांगितलं असलं तरी खासगी वाहनं रस्त्यावर उतरू देणार नसल्याचा पवित्रा मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शांततेच्या मार्गाने आरक्षणासह इतर मागण्या मांडणाऱ्या मराठा तरुणांच्या मागण्यांची राज्य सरकारने योग्य दखल घेतली नसल्याने ही उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री चिथावणीखोर वक्तव्ये करीत असल्याने हे आंदोलन चिघळले आहे, असा आरोप केला आहे. मराठा आंदोलनाच्या सद्य स्थितीवर एक निवेदन प्रसारित करीत पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.