‘मुंबई बुडाली हो’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर कुठे गेले?- उद्धव ठाकरे

88

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली? असे प्रश्न उपस्थित करत पावसामुळे मुंबईच्या सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली हो’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला चिमटे काढले आहेत.

नागपूरमध्ये पहिल्याच पावसाच्या दणक्यात शुक्रवारी विधिमंडळाचे दिवसभराचे कामकाज पूर्णत: वाहून गेल्याने राज्य सरकारची नाचक्की झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला. मुसळधार पावसाने नागपूर शहराची दैना उडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारे काही पाण्यात गेले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होते, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार, असे अग्रलेखात म्हटले आहे.

‘विकास पुरुष’ अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही आपल्या लाडक्या शहराची अवस्था बघून निःसंशय वेदना झाल्या असणारच. अनेक ठिकाणी तर गटारांचे पाणी नागरिकांच्या घरातील टॉयलेटमधून बाहेर पडू लागले. काही महिन्यापूर्वीच नागपूर शहराला देशातील ‘स्मार्ट’ शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. अशा ‘स्मार्ट’ शहराचे एका पावसात असे विद्रूपीकरण का झाले आणि त्याला जबाबदार कोण, यावर ‘चिंतन’ मात्र जरूर व्हायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.