मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर

288

पुणे, दि. २० (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर  वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर  रोख लावण्यात महामार्ग पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. अशा वाहनांवर कारवाई करणे, हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठरले आहे. आता वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून पळस्पे येथे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या माध्यमातून    वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

द्रुतगती मार्गावर ताशी ८० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश वाहनधारक  वाहन वेगमर्यादेचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. अनेक  वाहने ८० किमीपेक्षा अधिक वेगाने सुसाट असतात.  तर  काही वाहनधारक ताशी १२० किमी वेगाने वाहने पळवतात. यामुळेच  द्रुतगतीवर गेल्या काही वर्षात अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वाधिक अपघातांना वेगमर्यादा ओलांडणे व मार्गिका बदलणे हेच  कारणीभूत असल्याचे निष्पन्न् झाले आहे. वेगवान वाहनांना रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी  नाना प्रकारे उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्यांना यात यश आलेले नाही. काही दिवसांपूर्वी स्पीडगन वापरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्पीडगन हाताळण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा अभाव,   स्पीडगनची अपुरी संख्या,  चार्जिंगसाठी लागणारा  मोठा वेळ आदीमुळे हा उपाय कुचकामी ठरला होता.

दरम्यानच्या काळात  दोन टोलनाक्यांमध्ये वाहने किती वेगाने  धावतात, याबाबत तपासणी करण्यात आली. एखादे वाहन जेव्हा खालापूर टोलनाक्यावर येते, तेव्हा टोलच्या पावतीवर ते वाहन किती वाजता आले, याची नोंद केली जाते.  त्यानंतर ८० किमीच्या निर्धारित वेळेनुसार तेच वाहन पुढील कुसगाव टोलनाक्यावर विशिष्ट कालावधीत पोहोचणे आवश्यक असते. मात्र, या दोन टोलनाक्यांच्या दरम्यान बहुतांश  वाहने ८० किमीच्या वेगाने  धावतात  व निर्धारित वेळेच्या आधीच कुसगाव टोलनाक्यावर पोहोचल्याचे आढळून आले होते. यातूनच या वाहनाने  वेगमर्यादे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते. अशा अनेक उपाययोजना सपशेल अपयशी ठरलेल्या आहेत.

आता महामार्ग पोलिसांनी पळस्पे येथे नवी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.  या ठिकाणी कॅमेरे बसवून वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाचा फोटो काढला जाणार आहे. त्यानंतर   या वाहनाची माहिती तातडीने पुढील टोलनाक्यावर पाठवली जाणार आहे. त्या ठिकाणी  संबंधित वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल त्या वाहनधारकाला १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.   दरम्यान, द्रुतगतीवर  दुचाकी चालवणे मनाई आहे. तरीही काही स्थानिक तरुण दुचाकीवरून प्रवास करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कारवाई कडक  करण्यात येणार आहे.