मुंबई-पुणे द्रुतगतीवर आजपर्यंत किती टोल वसूल केला? – उच्च न्यायालय

62

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजपर्यंत किती टोल वसूल केला? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला केला आहे. द्रुतगतीवरील टोलवसुली संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने नोव्हेंबर २०१७ मध्ये केलेल्या सर्व्हेचा अहवाल बुधवारी (दि.४ )सादर करण्याचे आदेश आज (मंगळवार) न्यायालयाने दिले.

ठेकेदार जाणूनबुजून कमी टोलवसुली झाल्याचा कांगावा करत आहे का? हे या अहवालातून सिध्द होईल, असा दावा याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात केला. हा अहवाल सादर झाल्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल, बुधवारी आम्ही यासंदर्भात आदेश जारी करू, असे न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एमएसआरडीसीकडून टोल बंद करायचा की नाही? यावर येत्या तीन आठवड्यात अहवाल सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील सहा आठवड्यांनी राज्य सरकार टोलवसुलीबाबत आपला अंतिम निर्णय घेणार, अशी कबुली मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयात दिली. मात्र, एमएसआरडीसीने आपल्या अहवालात नेमक्या कोणत्या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यायचे, त्यावर बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय आपला आदेश देणार आहे.