मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद नाही, मराठा आंदोलकाचा निर्णय

553

मुंबई, दि.८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यभरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या बंदमध्ये मुंबई आणि ठाण्याचा समावेश नसणार आहे. यासोबत परळीलाही वगळण्यात आले आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. याआधी नवी मुंबईत कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यात येणार नाही, असा निर्णय सकल मराठा समाज नवी मुंबई समन्वय समितीने घेतला होता. या चारही ठिकाणी फक्त ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात ९ ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मात्र मुंबईमध्ये मोर्चा निघणार नाही. मुंबईत आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

२५ जुलै रोजी काढलेल्या मोर्चाला नवी मुंबईत हिंसक वळण लागले होते, आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा असे होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.