मुंबईसारख्या आयआयटी संस्थांचा देशाला अभिमान – पंतप्रधान मोदी  

179

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – जगभरातील टॉप संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश असणे, ही गौरवाची बाब असून आयआयटीतील विद्यार्थ्यांचा जगभरात डंका आहे. या शिक्षण संस्थांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. या संस्था नवीन भारताच्या स्तंभ आहेत,  असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) येथे केले.

आयआयटी मुंबईच्या ५६व्या दिक्षांत समारंभात पंतप्रधान बोलत होते. डिपार्टमेंट ऑफ एनर्जी सायन्स अॅण्ड इंजिनियरिंगच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही  यावेळी  करण्यात आले.

यावेळी ते म्हणाले की, ‘आयआयटीमध्ये विविधरंगी नटलेल्या भारताचे प्रतिबिंब दिसते. देशाच्या विकासात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे. ही संस्था कायमच देशाला दिशादर्शक ठरली आहे, अशा शब्दात मोदींनी आयआयटीवर  स्तुतीसुमने उधळली. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनेक यशस्वी स्टार्टअप सुरू केले असून त्यांनी अधिकाअधिक ‘इनोव्हेटिव्ह’ व्हावे, असे ते म्हणाले.

यावेळी आयआयटीने आयआयएमप्रमाणेच त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या महत्त्वाच्या समित्यांवर घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. माजी विद्यार्थ्यांचा मदतीने आयआयटीची पुढील जडणघडण अजून चांगली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून आयआयटी मुंबईच्या विकासासाठी  १००० कोटींच्या निधीची घोषणा  केली.